Google search engine
प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक  
कोल्हापूर : शहरवासियांना मुलभूत सोयी सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि मुलभूत सोयी सुविधा विना अडथळे, विनाविलंब पुरविणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. परंतु, ठेकेदारांचा निष्काळजीपणा आणि अधिकाऱ्यांचे होणारे दुर्लक्ष यामुळे नागरिकांना हक्काच्या सोयी सुविधांमध्ये अभाव दिसून येत आहे. महापालिकेचा कारभार सुधारावा म्हणून वारंवार सूचना देवूनही कामात प्रगती दिसून येत नाही. याचा रोष जनतेतून व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. शहरवासीयांच्या मुलभूत सोयी सुविधेत होणारा विलंब खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला.
उमा टॉकीज, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, नागाळा पार्क परिसरातील अपुऱ्या व दुषित पाणीपुरवठ्याबाबत शाहूपुरीत नागरिकांच्या विनंती नुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी पाणीपुरवठ्याबाबतच्या असंख्य तक्रारींचा पाढाच वाचून दाखविला. शहरातील अपुऱ्या व दुषित पाणी पुरवठ्याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत अधिकारी आणि ठेकेदारांच्या कामाचा नागरिकांसमोरच सोक्षमोक्ष लावला.
यावेळी सूचना देताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेत कोणाचाही हस्तक्षेप, दडपण खपवून न घेता नागरिकांना समान पद्धतीने पाण्याचे वाटप होईल याची दक्षता घ्या. जनतेला मिळणाऱ्या मुलभूत सोयी सुविधेत अडथळे येता कामा नयेत. अपुऱ्या पाणी पुरवठ्याची कारणे शोधून त्याचा अहवाल सादर करा. ज्या ठिकाणी नव्याने पाईपलाईन टाकाव्या लागणार आहेत त्या सर्व ठिकाणचा आराखडा तयार करून त्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, अशा सूचना दिल्या.
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here