शक्तीपीठ महामार्गाविरोधात १८ जुलैला पंढरपुरात शेतकऱ्यांची ‘सद्बुद्धी दिंडी’…

0
42
Google search engine

कोल्हापूर : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होत असून, १८ जुलै रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या ‘सद्बुद्धी दिंडी यात्रा’ आणि जाहीर सभेच्या पूर्वतयारीसाठी कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची सर्वपक्षीय बैठक पार पडली. राज्य सरकारने प्रकल्प अधिकृतपणे रद्द करण्याची घोषणा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बैठकीत कोल्हापूरसह राज्यातील १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पंढरपूर येथील वाखरी येथे मोठ्या संख्येने एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राज पॅलेस, इसबावी येथे जाहीर सभा होऊन वाखरी ते विठ्ठल मंदिर अशी ‘सद्बुद्धी दिंडी यात्रा’ काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आषाढी एकादशी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा आंदोलनात्मक कार्यक्रम होत असल्याने त्याकडे लक्ष लागले आहे.

संघर्ष समितीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची सुपीक जमीन आणि घरे हिरावून घेणारा हा प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी केली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, विधान परिषदेचे गटनेते सतेज (बंटी) पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार कैलास पाटील, कॉ. गिरीश फोंडे यांच्यासह विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कागल, हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने पंढरपूरकडे रवाना होणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here