प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत सोमवारी (२० एप्रिल) सकाळी ६ वाजता जाहीर करण्यात आले.वऱ्हाडातील सुमारे 350 वर्षांपासूनची परंपरा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी इथली घटमांडणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते. त्यामुळे शेतकरीच नव्हे, आता बी-बियाणे कंपन्याही ‘बिझनेस’साठी येथे गर्दी करतात.चंद्रभान महाराज यांच्या परंपरेतील पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी हे भाकीत मांडले.
यंदाच्या अंदाजानुसार, पिकांची एकूण स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. मात्र अतिवृष्टी आणि रोगराईमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. उत्पादन वाढले तरी शेतकऱ्यांना अपेक्षित समाधान मिळणार नाही, असे संकेतही देण्यात आले.
पावसाच्या अंदाजानुसार, जून महिन्यात कमी पाऊस, जुलैमध्ये वाढता पाऊस, तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होऊन नासाडी वाढण्याची शक्यता आहे.
राजकीय भाकितात सध्याचे नेतृत्व कायम राहील, असे संकेत देण्यात आले. मात्र नैसर्गिक संकटे आणि बाह्य तणावामुळे देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर ताण येऊ शकतो. तसेच आर्थिक स्थितीत चढ-उतार राहतील, असेही नमूद करण्यात आले.
घटमांडणीदरम्यान घागरीवरील पुरी गायब आढळल्याने पृथ्वीवर मोठ्या संकटांची शक्यता वर्तविण्यात आली. सकारात्मक बाजू म्हणून पाण्याची उपलब्धता चांगली राहील, गुरांसाठी चारा उपलब्ध होईल, पिकांचे उत्पादन वाढेल आणि बाजारभावही समाधानकारक राहतील, असे संकेत देण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विदर्भ, खान्देश, मराठवाडा तसेच मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आधुनिक हवामान अंदाज उपलब्ध असूनही सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या या घटमांडणीवर शेतकऱ्यांचा विश्वास कायम असल्याचे दिसून आले.






