Google search engine

प्रसारमाध्यम / दिग्विजय माळकर

 

राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे अत्यंत वेगाने पुढे सरकत असल्याने महाराष्ट्रात मान्सून नेहमीपेक्षा काही दिवस आधी दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, 29 मेपर्यंत राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कडाक्याच्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, मान्सून लवकर येत असला तरी पेरणीबाबत घाई करू नये, असा महत्त्वाचा इशारा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी दिला आहे.

त्यांच्या मते, शेतात किमान 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. अपुऱ्या पावसावर पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते, ज्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. आगामी मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील तापमानातही घट होणार असून उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळेल.

दरम्यान, मान्सूनपूर्व पाऊस अनेकदा वादळी स्वरूपाचा असतो. त्यामुळे काही भागांत जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. शेतात काम करताना तसेच प्रवासादरम्यान नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने केले आहे.

मुंबईतही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून दादरमधील शिवाजी पार्कसह अनेक भागांत हलक्या सरी कोसळल्या आहेत. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थितीही चिंताजनक आहे. सध्या राज्यातील धरणांमध्ये 30.53 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जायकवाडी धरणात 37 टक्के, खडकवासला धरणात 57.47 टक्के, तर कोयना धरणात केवळ 13 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here