प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
पश्चिम बंगाल मध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पक्षाने वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली आहे. शुक्रवारी कोलकात्यात झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या उपस्थितीत अधिकारी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
भाजपनं २९४ पैकी २०७ जागांवर विजय मिळवत बंगालमध्ये पहिल्यांदाच सत्ता स्थापन केली आहे. सुवेंदू अधिकारी हे राज्यातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यांचा शपथविधी शनिवारी होणार आहे.
विशेष म्हणजे, अधिकारी यांनी नंदिग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघांत विजय मिळवत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला. भवानीपूरमधील विजयामुळे त्यांना जायंट किलर अशी ओळख मिळाली आहे.
राजकीय वर्तुळात आता ‘आसाम पॅटर्न’ ची चर्चा सुरू झाली आहे.हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आसाममध्ये पक्षाला सत्ता मिळाली आणि पुढे त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देण्यात आली. त्याच धर्तीवर तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्याकडे बंगालची जबाबदारी देण्यात आल्याचे मानले जात आहे.
सुवेंदू अधिकारी हे एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र २०२० मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बंगालमध्ये भाजपचा विस्तार करण्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरली.






