Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील पराभव हा देशातील लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचा आरोप त्यांनी केला.

राऊत म्हणाले की, सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाचे अस्तित्वच संपवण्याच्या भूमिकेत काम करत असेल, तर भविष्यात विरोधकांनी निवडणुका लढवू नयेत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित करत, अशा प्रकारच्या निवडणुका पाकिस्तान, रशिया आणि अजरबैजानमध्ये होतात, असा आरोप केला.

त्यांच्या मते, भाजप आणि पंतप्रधान मोदी यांचे संपूर्ण लक्ष वर्षभर निवडणुका जिंकण्यावरच असते. देशातील विकास, रोजगार, सुरक्षा आणि महिलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

राऊत पुढे म्हणाले की, “देशात मोठ्या घडामोडी सुरू असताना पंतप्रधान आणि गृहमंत्री अनेक दिवस निवडणूक प्रचारात गुंतलेले असतात. सत्ता आणि पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे निकालांवर चर्चा करण्यालाही अर्थ उरत नाही.”

लोकशाहीबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, “या देशात लोकशाही कमकुवत झाली असली तरी निकाल स्वीकारावे लागतात आणि पुन्हा लढावे लागते.”

तसेच, इंदिरा गांधी यांचा दाखला देत त्यांनी दावा केला की, जसे त्यांच्या पराभवापूर्वी सर्व राज्यांत सत्ता होती, तशीच परिस्थिती आज मोदींची आहे. “पश्चिम बंगालमधील पराभव हा मोदींच्या पतनाची सुरुवात आहे. दिवा विझताना वात मोठी होते, हे हिंदुत्वाच्या शास्त्रात सांगितले आहे,” असे ते म्हणाले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here