प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
मुंबई : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कांद्याला प्रतिक्विंटल नव्हे तर प्रतिकिलो 24 रुपयांचा दर मिळावा, तसेच नाफेडने 8 ते 10 लाख टन कांदा खरेदी करून त्याची निर्यात करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी सध्या कांद्याला मिळत असलेला साडेबारा रुपयांचा दर वाढवून 16 रुपये करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचेही पवार यांनी सांगितले. यंदा पावसात 10 ते 12 टक्के घट होण्याचा अंदाज असून, पाऊस वेळेवर न आल्यास काय उपाययोजना करता येतील यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज
शेतकऱ्यांकडे पेरणीपूर्वी पैसा नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले. कर्जमाफीच्या अपेक्षेमुळे अनेक शेतकरी कर्जफेडीबाबत संभ्रमात असल्याचे त्यांनी सांगितले. “पावसापूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पैसा गेला नाही तर लागवड आणि पेरणी होणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
नीट घोटाळा आणि शक्ती कायद्यावरही चर्चा
NEET परीक्षेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे पवार म्हणाले. तसेच महामानवांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली. महिला आणि लहान मुलींच्या सुरक्षेसाठी प्रस्तावित शक्ती कायदा या अधिवेशनात मंजूर करावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
खर्च कमी करायचा असेल तर मोठ्या प्रकल्पांकडे पाहा
आमदारांचा पगार कमी करण्यापेक्षा सरकारने मोठ्या खर्चिक प्रकल्पांवर नियंत्रण आणावे, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. शक्तीपीठ महामार्ग आणि बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांवरील खर्च कमी करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
“पक्ष चालवण्यासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक”!
राजकीय पक्ष चालवण्यासाठी सक्षम नेतृत्व गरजेचे असल्याचे सांगताना पवार यांनी शरद पवार यांचे नेतृत्व अधोरेखित केले. सल्लागारांवर जास्त अवलंबून राहून महाराष्ट्रात राजकारण चालत नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.प्रशांत किशोर हे मोठे राजकीय सल्लागार असले तरी पक्षवाढीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.






