Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेला वडापाव आता अधिक महाग होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, येत्या १ जूनपासून नवे दर लागू होणार आहेत. या निर्णयामुळे लाखो प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरील स्टॉल्सवर मिळणाऱ्या वडापाव, समोसा, रगडा पाव यांसारख्या लोकप्रिय खाद्यपदार्थांच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. सध्या १३ रुपयांना मिळणारा वडापाव आता २० रुपयांना मिळणार असून, समोसाची किंमत १२ रुपयांवरून थेट २० रुपये करण्यात आली आहे. तसेच रगडा पावसाठी प्रवाशांना आता २५ रुपये मोजावे लागणार आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून वाढती महागाई, एलपीजी गॅसचे दर, इंधन दरवाढ आणि खाद्यपदार्थांच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दरवाढीमुळे रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दरवाढीसोबतच रेल्वे स्टॉल्सवरील मेन्यूमध्येही काही नवीन पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी स्लश ड्रिंक्स, क्रीम डोनट्स, सूप, डोसा आणि नूडल्स उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. तसेच काही पदार्थांच्या प्रमाणातही बदल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, ज्यूस आणि सोडा उत्पादनांच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे त्या पदार्थांचे दर पूर्ववत राहणार आहेत.

नवे दर असे

  • वडापाव : १३ रुपये → २० रुपये
  • समोसा : १२ रुपये → २० रुपये
  • रगडा पाव : २० रुपये → २५ रुपये

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here