कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
“रोहिणीचा पेरा अन् मोत्याचा तोरा” ही शेतकऱ्यांच्या भाषेतल्या आशेची, वेळेवर पडणाऱ्या पावसाची आणि सुरळीत शेतीच्या सुरुवातीची कहाणी. पण, यंदा मात्र ही पारंपरिक साखळी विस्कळीत झाली आहे. कारण, मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावल्याने रोहिणीचा पेरा बुडाला असून शेतकऱ्यांचे नियोजन ही कोलमडले आहे. काल २५ मे रोजीच्या रोहिणी मुहूर्तावर पेरणी करण्याची परंपरा आहे. त्या प्रमाणे कित्येक शेतकरी या मुहूर्तावर पेरणी करतात. पण, यंदा मात्र पावसाने धुमाकूळ घातल्याने हा मुहूर्त काही साधलेला नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी रोहिणी नक्षत्राच्या पावसावर भरवसा ठेवून खरीप हंगामाची पेरणी करत असतो. साधारण २५ मे रोजीच रोहिणी नक्षत्र सुरू होते. त्यामुळे या पहिल्याच दिवशी किंवा पुढे १५ दिवस हे नक्षत्र असल्याने म्हणजे मृग नक्षत्र सुरू होण्याच्या अगोदर पेरणी करतात. त्यातही नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी रान तयार करून किंवा धूळवाफ पेरणी करण्याची परंपरा आहे. पण, यंदा गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुहूर्तावर पेरणीच शक्य झाली नाही. याच काळात जमिनीत ओलावा टिकवून ठेवणारी पेरणी होते आणि नंतरचा विकास सुरळीत होतो. मात्र यंदा जूनच्या सुरुवातीलाच मान्सून दमदार झाला. त्यामुळे पेरणीपूर्व मशागती खोळंबल्या असून बळीराजा हवालदिल झाला आहे.
-
सोयाबीन, मका, भुईमूग या पिकांचे बीज रोहिणीच्या काळात पेरल्यास चांगला उगम होतो. यामुळेही शेतकरी याच दरम्यान पेरा करतात. यंदा लवकर पावसाचे आगमन झाल्याने काही ठिकाणी भर पावसात बीज भिजल्याने आणि काही भागांत जमीन वाहून गेल्याने उत्पादनावर थेट परिणाम होण्याची भीती आहे. तसेच आधीच बियाण्यांचे दर गगनाला भिडलेले असताना शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च परवडण्यासारखा राहिलेला नाही. हवामान बदलाचा परिणाम आता रोहिणी, मृग, आर्द्रा या पारंपरिक नक्षत्री संकल्पनांवरही पडताना दिसतो आहे.
-
यंदाची रोहिणी ओलसर नव्हे, तर ओसाड राहिली, आणि मोत्याचा तोरा पिकांमध्ये नव्हे, तर शेतकऱ्याच्या डोळ्यातच उतरला. वेळे आधी आलेल्या पावसाने पारंपरिक पेरणीचा तालच बिघडवला. आता खरी चिंता ही की, उरलेल्या पावसावर हंगाम सावरणार का ? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे.
आजचा हवामान अंदाज :
राज्यात मान्सूनने दमदार आगमन केल्यानंतर हवामानात बदल जाणवू लागला आहे. आज (सोमवार, २६ मे २०२५) रोजी महाराष्ट्राच्या विविध भागांत हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोकण किनारपट्टीवर, विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत आज मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग वाढल्याने मच्छीमारांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा हलक्या सरींची शक्यता –
मुसळधार पाऊस सुरूच आहे.- पश्चिम महाराष्ट्रात, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरणी संदर्भातील घाई न करता हवामान स्पष्ट होईपर्यंत थांबावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
- नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर या भागांमध्ये आजही तापमान ४० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. उष्ण वाऱ्यांसह दमट हवामान जाणवेल. काही भागांत दुपारनंतर हलक्याफार सरी होऊ शकतात, पण सरासरी वातावरण उष्ण राहील.
- औरंगाबाद, लातूर, नांदेड, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये आकाश हलकं ढगाळ राहील. संध्याकाळनंतर तुरळक ठिकाणी पावसाच्या टपोऱ्या सरींची शक्यता आहे.
- काही भागांत विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी वीज गाठू शकतील अशा उपकरणांपासून दूर रहावे.
मला कळत्यास तरी रोहिणीच्या नक्षत्राअगोदर इतका पाऊस व या नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी न होण्याचा प्रकार यंदा प्रथमच घडला आहे. निसर्गाचे चक्र पूर्णपणे बद्दलल्याचेच हे चित्र आहे. – संजय नार्वेकर, प्रगतीशील शेतकरी, राधानगरी
———————————————————————————————-






