प्रसारमाध्यम / राजेंद्र मकोटे
कोल्हापूर : समस्त मराठी चित्रपट विश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीची रंगत आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून १४ जागांसाठी तब्बल ४४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर वर्षा उसगावकर, आनंद शिंदे आणि विजय खोजीकर हे तीन उमेदवार आपापल्या गटातून बिनविरोध विजयी झाले आहेत.
दरम्यान, मावळते अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला “कपबशी” हे समान चिन्ह मिळाले असून विरोधी समर्थ पॅनेलला “पतंग” हे चिन्ह देण्यात आले आहे. तसेच अपक्ष उमेदवारांना कोल्हापुरी फेटा, गिटार, मोटारगाडी, फुलपाखरू आदी विविध चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे.
या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी नीलम शिर्के यांच्यासह माजी साळुंखे आदींनी माघार घेतल्याने काही समीकरणांमध्ये बदल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता मुख्य लढत दोन प्रमुख पॅनेलमध्ये रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महामंडळाच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथे ७ जून रोजी मतदान होणार असून ८ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि विविध घटकांचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या रागिनी खडके या निवडणूक प्रमुख असून रवींद्र बोरकर यांचे सहायक म्हणून काम करत आहे बॅलेट पेपरवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली जाणार आहे .






