राधानगरी : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेंतर्गत शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने राधानगरी ३३/११ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत स्थापित करण्यात आलेल्या अतिरिक्त ५ मेगावॅट क्षमतेच्या नवीन रोहित्राचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
या सुविधेमुळे राधानगरी परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत आणि विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सिंचनाची सुविधा वाढून शेतीची कामे अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहेत. रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाण्याची गरज कमी झाल्याने जंगली प्राण्यांच्या हल्ल्याचा धोकाही कमी होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी पंचायत समिती सभापती आर. वाय. पाटील (बापू), जि.प. सदस्य सागर धुंदरे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष दीपक शेट्टी, शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी चौगले, दक्षता समिती अध्यक्ष राजेश मोरे, विद्युत वितरण नियंत्रण समिती अध्यक्ष अमृत पाटील, धनाजी चौगले, राजेंद्र वाडेकर, शिवसेना शहरप्रमुख मंगेश चौगले, सुधाकरदादा साळोखे, संतोष पाटील, संग्राम पाटील, सचिन पालकर, शाखा अभियंता विलास डवर आणि सुशांत निकम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांची सुरक्षितता, सिंचनाची सुविधा आणि शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने हे रोहित्र महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे






