शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या ‘मिशन मोड’वर काम करण्याच्या सूचना

0
30
Google search engine

राधानगरी : राधानगरी पंचायत समिती येथे विविध समित्यांच्या बैठका घेऊन तालुक्यातील विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थी कोणत्याही शासकीय योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने ‘मिशन मोड’वर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

संजय गांधी निराधार योजनेतील प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा, वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे, सोलर पंप, नेट मीटर व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अंमली पदार्थांविरोधातील ‘नशामुक्त कोल्हापूर’ अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राधानगरी तहसील कार्यालयाचे बांधकाम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यासह, आरोग्य उपकेंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध करणे आणि ग्रामीण रुग्णालयात इको सुविधा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. राधानगरीतील १०० बेडच्या रुग्णालयाच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.

दाजीपूर पर्यटन विकासासाठी संबंधित ८४ गावांतील स्थानिकांच्या सूचना घेऊन सर्वंकष आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वित्त आयोगाचा निधी मंजूर उद्देशासाठीच वापरून अनावश्यक खर्च टाळण्याचेही निर्देश देण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव जाधव, सागर धुंदरे, अमृता डोंगळे, पंचायत समिती सभापती आर. वाय. पाटील (बापू), उपसभापती अश्विनी चौगुले, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे, दीपक शेट्टी, तानाजी चौगले, राजेश मोरे, अमृत पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here