नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
देशातील विरोधकांना एकत्र आणण्यासाठी उभी केलेली INDIA आघाडी सध्या संकटात आहे. आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसनंतर आता शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) सुद्धा या आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( मनसे ) यांच्यात झालेल्या सकारात्मक हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण उभे राहत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मनसेसोबत युतीच्या हालचालींना वेग
सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर शिवसेना ठाकरे गट INDIA आघाडीतून बाहेर पडण्याचा अंतिम निर्णय घेऊ शकतो. मराठी अस्मितेच्या मुद्यावर दोन्ही पक्षांची भूमिका समान असून, गेल्या काही आठवड्यांत दोन्ही गटांमध्ये वाटाघाटींची मालिकाच सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नवीन मराठी स्वाभिमानी आघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
समान भूमिकेचा पाया
उद्धव ठाकरे यांना INDIA आघाडीत काँग्रेस व इतर पक्षांशी तडजोड करत काम करावे लागत होते, तर राज ठाकरे यांची परप्रांतीय मुद्द्यावर स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे दोन टोकाच्या विचारसरणींशी बांधील राहण्याऐवजी उभय ठाकरे बंधू समान मुद्द्यांवर एकत्र येण्यास इच्छुक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून ते INDIA आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, बैठकीआधीच माध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्याशी युतीबाबत महत्त्वाचं विधान केलं. “राज ठाकरेंबरोबर युतीचा निर्णय घेण्यास आम्ही दोघं सक्षम आहोत, तिसऱ्यांची गरज नाही,” असे विधान करून उद्धव ठाकरेंनी आगामी राजकीय घडामोडींचा स्पष्ट इशारा दिला.
नवे आव्हान भाजप-शिंदे गटासमोर
शिवसेना ( ठाकरे गट ) आणि मनसे यांची युती झाली, तर राज्यात भाजप-शिंदे गटासमोर मोठं आव्हान उभं राहील. मराठी अस्मिता, भूमिपुत्रांचा हक्क, शहरी मतदारांमध्ये प्रभाव, रोजगार प्रश्न अशा मुद्द्यांवर एकत्र आलेले ठाकरे आणि राज हे राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून टाकू शकतात.
INDIA आघाडी समोरचं मोठं संकट
या पार्श्वभूमीवर, INDIA आघाडीसमोर नेतृत्व, समन्वय, आणि विश्वासाचा मोठा प्रश्न उभा ठाकलेला आहे. आधीच AAP आणि तृणमूल काँग्रेसने दूर लांबची भूमिका घेतलेली असताना आता ठाकरे गटही बाहेर पडल्यास, ही आघाडी फारशी टिकावू ठरणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याच्या तयारीत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत का ? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय रंगमंचावर एक नवे वळण आता स्पष्टपणे दिसू लागले आहे.
———————————————————————————————
Be the first to write a review