राज्याच्या कोकण, मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा

0
285
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

पुढील २४ तासांमध्ये राज्याच्या कोकणांसह मराठवाडा आणि विदर्भ, उत्तर महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईतही ६ ते ८ मे या कालावधीत अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. शहरातील बहुतांश भागांमध्ये दिवसा काहीसं ढगाळ वातावरण आणि सायंकाळ नंतर सोसाट्याचा वारा सुटून पावसाच्या तुरळक सरींची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं पुढील तीन दिवस राज्यासह मुंबईत पावसामुळे तापमानात किंचित घट होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

महाराष्ट्रात हवामानात अचानक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. मुंबई मध्ये संभाव्य वादळी पावसाच्या अंदाजासह वादळी वा-याची शक्यता ठाणे आणि पालघरमध्येही वर्तवण्यात आली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक अहिल्यानगर, पुणे सातारा संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, गोंदिया जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. ऊन, वारा आणि पावसाच्या या वातावरणात राज्यात सर्वाधिक तापमानही विदर्भातच नोंदवलं जात असून,  हा आकडा अद्यापही ४० ते ४२ अंशांच्याच घरात आहे. तर, मुंबई, पुणे आणि कोकणात मात्र पारा ३६ ते ३८ अंशांपर्यंत खाली आल्याचंही निदर्शनास येत आहे. 

उन्हाळा दिवसागणिक आणखी तीव्र होत असला तरीही त्याच्यावर गारपीट आणि अवकाळीचा मारा होत असल्यानं या उन्हाळ्याची तीव्रतासुद्धा काहीशी कमी भासत आहे. तिथं भर मे महिन्यात नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी गारपीटसह पाऊस झाला. सोमवार, ५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास शहरातील काही भागांमध्ये हलक्या गारपीटीसह पावसानं हजेरी लावली, तर पूर्व नागपूर आणि दक्षिण नागपूरातील्या बहुतांश भागांत गारपिटीसह पाऊस पाहायला मिळाला. 

मागील २४ तासांमध्ये जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड पट्ट्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. या मान्सूनपूर्व पावसाने पिलखोड शिवाराला झोडपलं, अनेक भागात जोरदार वादळी वारा, पाऊस आणि गारपीट झाल्यानं मका, ज्वारी, बाजरी, तसेच शेतात काढून ठेवलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आणि भीती सध्या व्यक्त केली जात आहे

———————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here