कल्पकम अणुकेंद्रातून अणुशास्त्र क्षेत्रात मोठे योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ शिवराम बाबुराव भोजे (वय ८२ ) यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भोजे यांचे जीवन संघर्ष, परिश्रम आणि विज्ञानसेवेने नटलेले होते.
कसबा सांगाव (ता. कागल) येथील दादासाहेब मगदूम हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेताना गणित आणि विज्ञान विषयांतील प्रावीण्यामुळे ते शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून १९६५ मध्ये पुणे विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सीओईपी येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. पुढे भाभा अणुसंशोधन केंद्रात सेवेत रुजू होऊन त्यांनी अणुऊर्जेच्या क्षेत्रात कार्य सुरू केले. विशेष प्रशिक्षणासाठी ते फ्रान्समध्येही गेले.
कल्पकम अणुकेंद्रात दीर्घकाळ सेवा करताना त्यांनी वैज्ञानिक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. फास्ट ब्रीडर रिऍक्टर प्रकल्पाच्या सुरुवाती पासून ते संचालक पदापर्यंत झेप घेत त्यांनी ४० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. पुढे ५०० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि अणू आयोगाची मंजुरी मिळवण्याची जबाबदारी नेटकेपणाने सांभाळली. कल्पकम येथे अणू आयोगाची पहिली बैठक घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली अणुऊर्जा क्षेत्रात अनेक नवे क्षितिजे गाठली गेली.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने त्यांना डि.लीट उपाधीने गौरविले, तसेच शिवाजी विद्यापीठाच्या विविध समित्यांवर त्यांनी मार्गदर्शन केले. ते ऑल इंडिया बोर्ड ऑफ पोस्ट-ग्रॅज्युएट एज्युकेशन अँड रिसर्च इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (AICTE) चे सदस्य राहिले.
विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबाबत २००३ ला त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा किताब देऊन गौरविले. यासह एच. के. फिरोदिया पुरस्कार, इंडस्ट्रियल रिसर्च अॅवॉर्ड, ‘कर्मयोगी’ पुरस्कार आदी विविध सन्मानानेही त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. २००४ ला सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते कोल्हापुरात स्थायिक झाले होते. शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या काळात त्यांनी तंत्रज्ञान विभागाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावली.
त्यांनी आपल्या मूळ गाव आणि आसपासच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी ‘आम्ही सांगावकर’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक सदस्य म्हणून कार्य केले. शिक्षण, ग्रामीण विकास आणि विज्ञानसेवा यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले. त्यांच्या मागे पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. त्यांचे योगदान विज्ञान, शिक्षण आणि समाजकारण यामध्ये कायम स्मरणात राहील.