पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा फोन : संजय पवारांची नाराजी दूर

बुधवारी मातोश्रीवर भेटायला येण्याचे निमंत्रण

0
398
Sanjay Pawar's displeasure has finally been resolved.
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

महाराष्ट्रात शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना ऊत आला असतानाच कोल्हापुरात मात्र शिवसेनेत अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीनंतर पक्षात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते.

शिवसेनेने कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी रविकिरण इंगवले यांची नियुक्ती केली आणि या निर्णयामुळे उपनेते संजय पवार यांनी नाराजी व्यक्त करत उपनेतेपदाचा राजीनामा दिला. संजय पवार म्हणाले, “१९९० पासून मी शिवसेनेत काम करतो आहे. गेली ३६ वर्षे मी एकनिष्ठपणे पक्षासाठी झटतो आहे. मातोश्रीवरून जे आदेश येतात, त्याचे तंतोतंत पालन करतो. पण गेल्या १० वर्षांत पक्षात वेगळं घडत आहे. जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत पारदर्शकता आणि विश्वासार्हता पहायला हवी.”

संजय पवार – विधानसभा निवडणुकीत षडयंत्र करण्यात आलं. मधुरीमाराजे यांनी अचानक माघार का घेतली, याचा विचार झाला पाहिजे. जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक होते, पण नियुक्ती करताना उपनेत्यालाही विचारलं जात नाही, हे खटकतं. त्यामुळे आपण उपनेतेपदाचा राजीनामा देत असून, मात्र एक शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, संजय पवार यांच्या नाराजीचा फायदा उठवत शिंदे गटाने त्यांना जाहीर ऑफर दिली होती. मंत्री उदय सामंत यांनी खुलं आमंत्रण दिल्यानंतर त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना गती मिळाली. मात्र, ठाकरे गटाने तातडीने हालचाली सुरू करत, ज्येष्ठ नेते सुनील प्रभू यांना मध्यस्थीसाठी पाचारण केलं.

सुनील प्रभू यांनी संजय पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय पवार यांच्यातही थेट संवाद झाला. या चर्चेनंतर संजय पवारांची नाराजी दूर झाली आहे.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शिवसेनेतील गोंधळ काहीसा थांबला असला तरी, जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून निर्माण झालेली खदखद कितपत पूर्णपणे शमते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संजय पवार बुधवारी दुपारी सा़डेबारा वाजता ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत जिल्ह्याच्या राजकारणासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. संजय पवार यांनी, “काही मतभेद होते, पण ते मिटले आहेत. मी ठाकरे गटासोबतच ठाम राहणार आहे,” असं स्पष्ट केलं.

——————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here