Agriculture Minister Manikrao Kokate, Deputy Chief Minister, Ajit Pawar
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची शक्यता अधिकच बळावली आहे. आज सकाळी कोकाटे आपल्या मुलीसह मंत्रालयात दाखल झाले आणि थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अँटी चेंबरमध्ये गेले. या भेटीत अजित पवार यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले.
“कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवं,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त करत अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, असे आश्वासन दिले. त्यानंतर दोघांमध्ये थोडक्याच वेळात जुजबी चर्चा होऊन बैठक संपली.
याचवेळी अजित पवार यांच्या दालनात प्री-कॅबिनेट बैठकीला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते या बैठकीसाठी एकत्र आले आहेत. या बैठकीनंतर कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्यासाठी समर्थन घेऊन नाशिक जिल्ह्यातील काही शेतकरी कार्यकर्ते मंत्रालयात पोहोचले. त्यांनी अजित पवार यांची भेट घेत, कोकाटेंचा राजीनामा घेऊ नये, अशी विनंती केली. मात्र, त्यावर अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हणाले, “किती वेळा चुका करणार आणि किती वेळा माफ करायचं? राजीनामा नको म्हणून आज तुम्ही आलात, पण मी स्वतःहून मंत्रिपद दिलं, तेव्हा कुणीही आलं नव्हतं. सतत चुका होत असल्यामुळे आता माफी नाही ! “
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोकाटे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्यामुळे याप्रकरणी अजित पवारांवर निर्णायक भूमिका घेण्याचा दबाव वाढला आहे. त्यामुळे कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा आता जवळपास निश्चित मानला जात आहे.