शिरोळ तालुक्यात केळी लागवडीत वाढ

गतवर्षी ४९ हेक्टर तर यावर्षी तब्बल १९८ हेक्टर क्षेत्रात लागवड.

0
198
Google search engine

कुरुंदवाड : प्रतिनिधी

केळी या पिकांतून रोख पैसा मिळत असल्याने शिरोळ तालुक्यातील शेतकरी आता केळीच्या लागवडीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. यावर्षी शिरोळ तालुक्यात सुमारे १९८ हेक्टर क्षेत्रात केळीची लागवड करण्यात आली आहे. गतवर्षी तालुक्यात ४९ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली होती. यावरुन केळीच्या पिकाकडे बहुतांशी शेतकर्‍यांचा कल दिसून येत आहे.

केळीला भरपूर पाणी लागते. तालुक्यातील सर्वच नद्या बाराही महिने दुथडी भरुन वाहतात. यामुळे आपल्याकडे पाण्याची उपलब्धतता असल्यामुळे शिरोळ तालुक्यात केळीचे क्षेत्र वाढत आहे. शिरोळ तालुक्यात प्रामुख्याने नगदी पीक म्हणून  ऊसाकडे पाहिले जाते. मात्र सतत ऊस पिकाने जमिनीची प्रत खालावत जात आहे. केळीच्या पिकापासून चांगल्या खताची निर्मिती होते, जमिनिची सुपीकताही टिकून राहण्यास मदत होते. यामुळे एक वेगळा प्रयोग करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी आधूनिक पद्धतीने केळी पिक करण्याकडे वळत आहेत. केळी ही गरीबापासून श्रीमंतापर्यंत खाल्ली जातात. बाराही महिने बाजारात मिळणारे एकमेव फळ म्हणजे केळी आहे. याचा विचार करुन तालुक्यातील बहुतांशी शेतकरी केळीचे उत्पादन घेताना दिसत आहेत.
आंब्याच्या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळी हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पिक आहे. केळीचे लागवड करण्यासाठी चांगली निचरा होणारी, भुसभुसीत जमिन आणि भरपुर सुर्यप्रकाश लागतो. केळीला भरपूर पाणी लागते. पाट पाण्यासह ठिबक सिंचनाचाही वापर चालतो. पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास केळीचे चांगले उत्पादन घेता येते. केळीची लागवड साधारणतः जुन,जुलै आणि आँक्टोबर,नोव्हेंबर महिन्यात करतात. याची लागवड कंदापासून किंवा उतीसंवर्धीत (Tissue Culture) रोपापासून करतात. केळीचे पीक साधारणपणे १२-१४ महिन्यात काढणीसाठी येते. जास्त उत्पादनासाठी केळीची लागवड जुन- जुलै महिन्यात केली जाते आणि भाव चांगला मिळण्यासाठी आँक्टोबर महिन्यात लागवड केली जाते.
केळी लागवडीसाठी साधारणतः एकरी दीड लाख ते दोन लाख रुपये खर्च येतो. यामध्ये जमीन तयार करणे, खते, बियाणे, मजुरी, पाणी व्यवस्थापन, किडनाशके आणि काढणीचा खर्चाचा समावेश होतो. यातून वर्षाला एकरी ३५ ते ४० टन उत्पादन मिळते. केळीची विक्री ही व्यापार्‍याला क्विंटलमध्ये, टनावर केली जाते. सध्या बाजारात टनाला १८ हजार ते २१ हजार  रुपये भाव आहे. दर चांगला मिळाल्यास एकरी ७ ते ९ लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. केळीची बाग ही साधारणपणे ३ वर्षे टिकते. एकाच बागेतून अनेक वर्ष फळं मिळू शकतात. कारण केळीच्या झाडाच्या मुळाशी शोषक नावाचे छोटे कोंब येतात. हे शोषक कोंब नवीन झाड म्हणून वाढतात. यातून पुन्हा फळं मिळतात. केळी पिकाला संतुलित खत मात्रा , झाडांना नियमित कीड आणि रोग नियंत्रणासाठी उपाय योजना केल्यास उत्पादन मोठ्या प्रमाणावर निघते.
आंबा, द्राक्ष, कलिगंड, सीताफळ यासारखी फळे विशिष्ठ हंगामापुरती बाजारात मिळतात. मात्र केळी हे असं एक फळ आहे जे बाराही महिने बाजारपेठेत उपलब्ध असते. याशिवाय भारतात व्रत-वैकल्ये, पुजेसाठी केळीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तसेच श्रावण महिना, गणेश चतुर्थी, नवरात्र उत्सव, दिवाळी, रमजान ईद आदी सणावेळी केळीचा चांगलाच खप असतो. यामुळे शिरोळ तालुक्यात सुमारे १९८ हेक्टर क्षेत्रात केळीची लागवड होत आहे. तालुक्यात राजापुर व खिद्रापूर या दोन गावांना केळीचे आगार म्हणुन ओळखले जाते. मात्र आता तालुक्यात बहुतांशी गावात केळीचे क्षेत्र वाढत आहे.
शिरोळ तालुक्यात यावर्षी एकूण १९८ हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये जयसिंगपूर मंडलच्या २६ गावात ५४ हेक्टर तर कुरुंदवाड मंडलच्या २६ गावातील कार्यक्षेत्रात १४४ हेक्टर क्षेत्रात केळीची लागवड करण्यात आली आहे. 
खिद्रापूर ( ता.शिरोळ) येथे ७० ते ८० एकरात केळीची लागवड करण्यात आली आहे. व्यापारी स्वतः बांधावर येऊन केळी घेऊन जातात. यामुळे शेतकर्‍यांच्या हातात रोख पैसा मिळतो आहे. सध्या केळीच्या जी-९ या जातीला मोठी मागणी आहे. एक्सपोर्टसाठी या केळीला टनाला २४ हजार रुपयापर्यंत दर मिळत आहेअमर कुरुंदवाडे. केळी उत्पादक शेतकरी, खिद्रापूर.ता.शिरोळ.                                                                       

केळी पिकासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकर्‍यांना हेक्टरी २ लाख,८९ हजार,३२० रुपयाचे अनुदान टप्पाटप्प्याने मिळते. यासाठी शेतकर्‍यांनी नजीकच्या तालुका कृषी केंद्राशी संपर्क साधावा — सी.बी.जंगले, शिरोळ तालुका कृषी अधिकारी.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here