प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
कोल्हापूर: राज्यातील प्रमुख दूध संघांपैकी एक असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळात चांगलीच हालचाल सुरू झाली असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी मतदार यादी निश्चितीचा प्रशासकीय कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संलग्न प्राथमिक सहकारी दूध संस्थांनी आपल्या प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव १ जुलै २०२६ पर्यंत सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ अंतर्गत ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. २६ मे ते १ जूनदरम्यान संबंधित संस्थांना प्रतिनिधी नियुक्तीबाबत सूचना पाठविण्यात येणार असून, २ जून ते १ जुलै या कालावधीत संस्थांनी प्रतिनिधींचे ठराव ताराबाई पार्क येथील तात्पुरत्या निवडणूक कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
प्राथमिक मतदार यादी तयार करण्यासाठी प्रतिनिधी आणि सभासदांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम निवडणूक कार्यक्रम, उमेदवारी अर्ज प्रक्रिया आणि मतदानाची तारीख जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, भाजप आमदार शिवाजी पाटील आणि गर्जना संघटनेचे नेते प्रकाश बेलवाडे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
सध्या पाच सदस्यीय प्रशासक मंडळ संघाचा कारभार पाहत असून, १३२० प्राथमिक दूध संस्थांविरोधातील याचिकेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन प्रक्रिया देखील महत्त्वाची ठरणार आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम पात्र संस्थांची यादी आणि निवडणुकीचा अंतिम कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गोकुळच्या निवडणुकीतून आगामी काळात कोल्हापूरच्या राजकारणातील नवी समीकरणे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या निवडणुकीवर केंद्रीत झाले आहे.






