Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ भागात आज सकाळी भूकंपाचे सौम्य ते मध्यम धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम तसेच यवतमाळ या भागांत हे धक्के प्रकर्षाने जाणवले.

सकाळी सुमारे ८:४५ ते ८:४७ वाजण्याच्या सुमारास हा भूकंप झाला. काही ठिकाणी धक्क्यांची तीव्रता अधिक असल्याने घरांच्या भिंतींना तडे गेले, तर घरांवरील पत्रे हलल्याच्या घटना घडल्या. अचानक आलेल्या धक्क्यांमुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले.

विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाचा मोठा प्रभाव जाणवला. घरातील भांडी व इतर वस्तू खाली पडल्याच्या घटना घडल्या असून काही घरांना तडे गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे परिसरात, सुमारे १० किमी खोलीवर असल्याचे सांगितले जात आहे.

नांदेड शहरातील सिडको, वजीराबाद, आनंदनगर आणि तरोडा सांगावी भागातही हे धक्के स्पष्टपणे जाणवले. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी परिसरातही भूकंपाचे सौम्य धक्के बसले.

सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here