कोल्हापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजने अंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाने मोठा निर्णय घेत राज्यातील ५०० ग्रामपंचायतींना नवी इमारत व नागरी सुविधा केंद्र उभारण्यासाठी निधी मंजूर केला आहे. या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींचा समावेश असून प्रत्येकी २५ लाख रुपये असा एकूण ८ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ३,००० पेक्षा अधिक आहे आणि ज्यांच्याकडे स्वमालकीची ग्रामपंचायत इमारत नाही अथवा ती धोकादायक व मोडकळीस आलेली आहे, अशा ग्रामपंचायतींसाठी हे अनुदान देण्यात येत आहे. यासाठी मागवलेल्या प्रस्तावांपैकी ५०० ग्रामपंचायतींची यादी केंद्र शासनाने मे २०२५ मध्ये मंजूर केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थी ग्रामपंचायती
-
राधानगरी तालुका – तुरंबे, आवळी बु., म्हासुर्ली
-
भुदरगड – मुदाळ, वाघापूर
-
चंदगड – दाटे
-
गडहिंग्लज – हलकर्णी, हिटणी, हसुरचंपू
-
हातकणंगले – घुणकी, हेरले, वहगाव पाडळी
-
कागल – चिखली
-
करवीर – दिंडनेर्ली, केर्ले, सरनोबतवाडी, हणमंतवाडी, आमशी, बोलोली, वरणगे, चिंचवाड
-
शाहूवाडी – कड़वे
-
शिरोळ – कोथळी, उमळवाड, शेडशाळ, शिरटी, कवठेसार, जांभळी, टाकळी, नांदणी, शिरढोण
प्रत्येक ग्रामपंचायतीला निधीचे वाटप कसे ?
-
ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी – २० लाख रुपये
-
नागरी सुविधा केंद्रासाठी – ५ लाख रुपये, असा एकूण २५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे.
अटी आणि शर्ती
-
नागरी सुविधा केंद्रासाठी स्वतंत्र खोलीचे बांधकाम केले नसल्यास ५ लाखांचा निधी खर्च करता येणार नाही.
-
बांधकामासाठीची जागा वादविरहित, बोजारहित आणि ग्रामपंचायतीच्या मालकीची असावी.
-
कामासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता ग्रामपंचायतींनी करावी लागणार आहे.
-
सुविधा केंद्राची जागा ग्रामपंचायत इमारतीच्या लगत असावी किंवा स्वतंत्र रित्या उपलब्ध असावी.
या निर्णयामुळे ग्रामपंचायत प्रशासन सशक्त होईल. तसेच नागरिकांना बँक, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वृद्धापकाळ निवृत्ती, पाणीपट्टी, मालमत्ता कर, शासकीय योजना अर्ज यांसारख्या सेवा एका छताखाली सहज मिळतील. ग्रामीण विकासासाठी एक सकारात्मक पाऊल टाकत, ग्रामपंचायतींच्या बळकटीसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
—————————————————————————–






