प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या गोटातून एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या खांद्यावर लवकरच मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता असून, त्यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
नेमकी काय आहे चर्चा? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त झाली आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांना दोन वर्षांच्या उर्वरित टर्मऐवजी सहा वर्षांची पूर्ण टर्म असलेल्या जागेवर राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. या संदर्भात पार्थ पवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याचे समजते.
पवारांच्या नव्या पिढीवर जबाबदारी: अजित पवारांच्या पश्चात आता सुनेत्रा पवार राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री म्हणून सूत्रे सांभाळत आहेत, तर त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय पवार अधिक सक्रिय होताना दिसत आहेत. पार्थ पवार दिल्लीत पक्षाचे प्रतिनिधित्व करतील, तर जय पवार देखील संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
शरद पवारांचा दिल्ली दौरा रद्द: दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचा नियोजित दिल्ली दौरा अचानक रद्द झाला आहे. बारामतीमध्ये अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ते दिल्लीला जाणार होते, मात्र हा दौरा का रद्द झाला, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.






