प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
राज्यात कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादकांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारमार्फत आजपासून महाराष्ट्रात प्रति किलो 12 रुपये 35 पैशांनी कांदा खरेदी सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना मी विनंती केली की, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अनेक शेतकरी एक रुपया भाव मिळत असल्याने कांदे फेकून देण्याच्या स्थितीत आहेत. कांद्याचे शेल्फ लाईफ कमी असल्याने त्याची साठवणूक करणेही अवघड आहे. मात्र आपल्या विनंतीला मान देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आजपासून 12 रुपये 35 पैशांनी कांदा खरेदी सुरू होत आहे.”
राज्यात कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती, निर्यातीत आलेले अडथळे आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे कांद्याला किमान हमीभाव, अनुदान आणि नाफेडमार्फत खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
यावेळी फडणवीस यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतही भाष्य केले. “देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायची असेल तर महिलांचा सहभाग वाढवावा लागेल. ‘लाडक्या बहिणी’ अर्थव्यवस्थेत उतरल्या तरच हे लक्ष्य साध्य होईल,” असे ते म्हणाले.
दरम्यान, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कांद्याचे दर कोसळणे ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले. आखाती देशांतील युद्धामुळे जागतिक व्यापारावर परिणाम झाला आहे. निर्यात बंदी नसतानाही होर्मूझ सामुद्रधुनीतील परिस्थितीमुळे शेतीमाल अडकून पडत आहे. सरकार यावर निश्चित विचार करेल,असे त्यांनी म्हटले.






