प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
मे महिन्याच्या अवघ्या १५ दिवसांत सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल, CNG, दूध आणि सोन्यावरच्या आयात शुल्कापर्यंत अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. मध्य-पूर्वेतील तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयातील घसरण यामुळे देशातील महागाईचा दबाव वाढताना दिसत आहे.
कोणत्या वस्तू किती महागल्या?
व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग
१ मेपासून १९ किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात तब्बल ₹९९३ ची वाढ करण्यात आली. दिल्लीत सिलिंडरची किंमत ₹३०७१.५० वर पोहोचली असून मुंबईतही दर ₹३००० च्या आसपास गेले आहेत. मात्र घरगुती LPG सिलिंडरचे दर सध्या स्थिर ठेवण्यात आले आहेत.
सोन्यावरील आयात शुल्क वाढले
सरकारने सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. त्यामुळे पुढील काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दूधही महागले
१३ मे रोजी अमूल आणि मदर डेअरी या प्रमुख दुग्ध कंपन्यांनी दुधाच्या दरात प्रतिलिटर ₹२ ची वाढ जाहीर केली. दूध खरेदी खर्च वाढल्याने हा निर्णय घेतल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले.
CNG दरवाढ
मुंबईत CNG च्या दरात प्रतिकिलो ₹२ वाढ करून दर ₹८४ प्रति किलो करण्यात आला. त्यानंतर १५ मे रोजी दिल्लीतही CNG ₹७९.०९ प्रति किलोवर पोहोचला. यामुळे ऑटो आणि सार्वजनिक वाहतूक भाडेवाढीची शक्यता निर्माण झाली आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर वाढले
१५ मे रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ₹३ वाढ जाहीर केली. मध्य-पूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने तेल कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढल्याचे सांगितले जात आहे.
इंधन दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होणार असून भाजीपाला, अन्नधान्य, हॉटेलिंग, प्रवास आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू आणखी महाग होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील काही आठवड्यांत महागाईचा दबाव अधिक वाढू शकतो.






