प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर इराणला अण्वस्त्र मिळू देता कामा नये, यावर दोन्ही देशांचे एकमत झाल्याचे सांगितले. तसेच, होर्मूझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली.
बीजिंगमध्ये सुरू असलेल्या अमेरिका-चीन चर्चेच्या दुसऱ्या दिवशी ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधताना इराण युद्ध, तैवान, व्यापार आणि जागतिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.
इराणवर अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारीपासून हल्ले सुरू केल्यानंतर इराणने होर्मूझ सामुद्रधुनीतील बहुतांश जहाज वाहतूक रोखली होती. त्यामुळे जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. चीन हा इराणच्या तेलाचा प्रमुख खरेदीदार मानला जातो.
ट्रम्प यांनी एका टी.वी. चॅनेल वरील मुलाखतीत इराणबाबत कठोर भूमिका घेत म्हणाले, माझा संयम आता संपत चालला आहे. इराणने करार करायला हवा. इराणकडे असलेल्या समृद्ध युरेनियम साठ्याबाबत त्यांनी सांगितले की, तो अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असणे मुख्यतः जनसंपर्काच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराण युद्धाबाबत नाराजी व्यक्त करत हा संघर्ष कधीच व्हायला नको होता आणि तो पुढे सुरू ठेवण्याचे कोणतेही कारण नाही, असे म्हटले.
व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, चीनने होर्मूझ सामुद्रधुनीचे लष्करीकरण आणि वाहतुकीवर टोल लावण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला विरोध दर्शवला आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, शी जिनपिंग यांनी इराणला लष्करी उपकरणे न देण्याचे आश्वासन दिले आहे.
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनीही चीन होर्मूझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी सहकार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला. युद्धापूर्वी जगातील सुमारे २० टक्के तेल आणि एलएनजी पुरवठा या मार्गातून होत होता.
विश्लेषकांच्या मते, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांपूर्वी हे युद्ध ट्रम्प प्रशासनासाठी राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनले आहे. त्यामुळे चीनचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे.






