प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
मंत्रालय येथे दहशतवादी कारवायांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. राज्याच्या प्रशासकीय मुख्यालयाभोवती आता पोलिसांच्या ‘एलिट गार्ड’ या अत्यंत प्रशिक्षित कमांडोंचं मजबूत संरक्षक कवच उभारण्यात आलं आहे.
मुख्य प्रवेशद्वार आणि गार्डन गेटवर प्रत्येकी एक एलिट गार्ड कमांडो तैनात करण्यात आला असून, त्यांच्या हाती AK-47 सारखी अत्याधुनिक शस्त्रं देण्यात आली आहेत. काळे गॉगल, ट्रिगरवर सतत सज्ज बोट आणि संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष अशा सज्जतेत हे कमांडो 24 तास कार्यरत आहेत. मंत्रालयाला सध्या तिहेरी सुरक्षा कवच देण्यात आलं आहे.
‘एलिट गार्ड’ म्हणजे काय?
एलिट गार्ड ही पोलीस दलातील विशेष प्रशिक्षित तुकडी असून, दहशतवादविरोधी कारवाया, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचं संरक्षण आणि गोपनीय मोहिमा यासाठी त्यांचा
वापर केला जातो. दहशतवादी हल्ले परतवून लावण्याचं विशेष प्रशिक्षण या कमांडोंना दिलेलं असतं. सुरक्षेच्या कारणास्तव ही तुकडी आता मंत्रालयात कायमस्वरूपी तैनात करण्यात आली आहे.
ATS ची उत्तरप्रदेशात कारवाई
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याच्या संशयावरून वाराणसी येथे छापेमारी केली आहे. आदमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पठाणी टोला परिसरात ही कारवाई करण्यात आली.
या छाप्यात डॉ. आरिफ अन्सारी आणि त्यांचा मुलगा अबू बक्र यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. ATS ने त्यांच्या घरातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, महत्त्वाची कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित पुरावे जप्त केले आहेत.
या प्रकरणात परदेशातून येणारा निधी, हवालाच्या माध्यमातून होणारे व्यवहार, तसेच संशयितांचे बँक आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन यांचा सखोल तपास सुरू आहे. त्यांचे कोणत्याही बंदी घातलेल्या संघटनांशी संबंध आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे. महाराष्ट्र आणि वाराणसी ATS कडून संयुक्त कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.






