प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून, वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. देशाकडे परकीय चलनसाठा मर्यादित असून, कर्जफेडीसाठी विविध देशांकडे मदतीची मागणी केली जात आहे.
अलीकडे युनायटेड अरब एमिरेट्स (UAE) ने पाकिस्तानला दिलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी कडक भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानने मुदतवाढ मागितली असली तरी UAE ने त्यास नकार देत तातडीने परतफेडीचा इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे.
पंतप्रधान व लष्कर प्रमुखांची कर्जासाठी धावपळ
शहबाज शरीफ व जनरल आसिम मुनीर हे कर्ज मिळवण्यासाठी कतार, सौदी अरेबिया आणि तुर्की या देशांकडे प्रयत्न करत आहेत. काही प्रमाणात मदत मिळण्याची शक्यता असली तरी अपेक्षित मोठी आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही.
सौदी अरेबियाने सुमारे 3 अब्ज डॉलरपर्यंतच मदत करू शकतो, अशी भूमिका स्पष्ट केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोरील आर्थिक संकट अधिकच तीव्र झाले आहे.
चीनकडूनही निराशा
चीन हा पाकिस्तानचा पारंपरिक मित्र देश मानला जात असला तरी, सध्याच्या परिस्थितीत मोठी आर्थिक मदत देण्यास चीनने उत्सुकता दाखवलेली नाही. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
IMF च्या अटींचा अडसर
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून मदत मिळवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत असला तरी, त्यासाठी कठोर अटी लागू आहेत. देशाकडे सुमारे 16 अब्ज डॉलरचा साठा असला तरी, IMF च्या अटींमुळे तो मुक्तपणे वापरता येत नाही.
परिस्थिती गंभीर
एकीकडे वाढतं कर्ज, दुसरीकडे मर्यादित मदत आणि कठोर आर्थिक अटी या सगळ्यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. येत्या काळात कर्जफेड आणि आर्थिक स्थैर्य राखणं हे पाकिस्तानसमोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे.






