सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर; कोल्हापुरात नवीन कोर्ट रूमचे उद्घाटन

0
15

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालय यांच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे कामकाज समाधानकारक पद्धतीने सुरू असून लवकरच त्याचे पूर्ण खंडपीठात रूपांतर होणार असल्याची माहिती मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी दिली. या प्रक्रियेसाठी सर्वोच्च न्यायालय यांच्याशी आवश्यक पत्रव्यवहार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गुरुवारी सर्किट बेंचमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्य न्यायमूर्तींच्या हस्ते सहाव्या कोर्ट रूमचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी डिव्हिजन बेंच क्रमांक एकवर खटल्यांचे कामकाजही पाहिले. त्यांच्या सोबत न्यायमूर्ती माधव जामदार उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर वकिलांनी मुख्य न्यायमूर्तींचा सत्कार केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “सर्किट बेंचचे खंडपीठात रूपांतर झाल्यास सहा जिल्ह्यांतील पक्षकार आणि विशेषतः तरुण वकिलांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे ही न्यायव्यवस्थेची जबाबदारी आहे.”

या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सर्किट बेंचमध्ये पायाभूत सुविधांमध्येही वाढ करण्यात येत आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या सहाव्या कोर्ट रूममध्ये न्यायमूर्ती प्रवीण पाटील कामकाज पाहणार आहेत.

कार्यक्रमाला न्यायमूर्ती ए. एल. पानसरे, एम. डब्ल्यू. चंदवानी, सचिन देशमुख, रणजितसिंह राजा भोसले यांच्यासह अनेक न्यायमूर्ती, प्रशासकीय अधिकारी आणि वकील उपस्थित होते.

 मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती जामदार यांच्या खंडपीठासमोर एकूण ५३ खटल्यांची सुनावणी झाली, ज्यामध्ये सहा जनहित याचिकांचा समावेश होता. आज, शुक्रवारीही खटल्यांचे कामकाज सुरू राहणार आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here