प्रसारमाध्यम l दिग्विजय रा. माळकर
महाराष्ट्र शासनाने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी कृषी विभागांतर्गत राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्य, सामाजिक आधार आणि आर्थिक सक्षमीकरणावर केंद्रित उपाययोजना राबविण्यासाठी ही कृतिदल कार्यरत राहणार आहे, राज्य सरकारचा हा निर्णय देशात पहिल्यांदाच अशा स्वरूपात राबवला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे
कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवाडी अध्यक्षस्थानी असणार आहेत, तर सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन बुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यजित शितोळे, सोनाली शिळकर हे शासकीय सदस्य म्हणून काम पाहणार आहेत, सृष्टी डोईजड या अशासकीय सदस्य म्हणून सहभागी होणार आहेत
शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्य क्षेत्रात गेली दहा वर्षे कार्यरत असलेले कृषी धोरण तज्ञ डॉ. विनायक हेगाणा यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांनी विकसित केलेल्या ‘पिरॅमिड मॉडेल’च्या माध्यमातून तसेच ‘शिवार संसद’ आणि ‘शिवार हेल्पलाइन’ उपक्रमांद्वारे आतापर्यंत २४९८ शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश मिळाले आहे, आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे
नुकतेच डॉ. हेगाणा यांना स्वित्झर्लंड येथील डंस्टर बिझनेस स्कूलकडून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली असून ते हा सन्मान मिळवणारे देशातील पहिले कृषी पदवीधर संशोधक ठरले आहेत, तसेच ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठेच्या चेव्हनिंग ग्लोबल पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे
टास्क फोर्समार्फत शेतकरी आत्महत्यांची आर्थिक, सामाजिक आणि मानसिक कारणमीमांसा करण्यात येणार आहे, हवामान बदलांचा शेतीवर होणारा परिणाम अभ्यासला जाणार आहे, अल्पकालीन व दीर्घकालीन धोरणात्मक उपाय सुचवले जाणार आहेत, शेती तंत्रज्ञान, आर्थिक सहाय्य, सामाजिक आधार व मानसिक आरोग्यावर आधारित एकात्मिक मॉडेल विकसित करण्यात येणार आहे, आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळातील तातडीच्या उपाययोजना आणि आपत्तीनंतर पुनर्वसनासाठी विशेष कृती कार्यक्रम तयार केला जाणार आहे, विभागीय व जिल्हास्तरावर अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार केला जाणार आहे, विविध शासकीय, निमशासकीय व स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधला जाणार आहे

कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्या हा केवळ नुकसानभरपाईचा विषय नसून शेतकऱ्याला सक्षम करण्याचा विषय आहे, कृषी विभागाच्या विविध योजना आणि इतर विभागांच्या समन्वयातून उत्पादनवाढीसोबत उत्पन्नवाढ साध्य करण्यासाठी हा टास्क फोर्स महत्त्वाची भूमिका बजावेल
विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवाडी यांनी नमूद केले की, यापूर्वी विविध समित्यांनी केलेल्या अभ्यासाचा आढावा घेऊन बदलत्या काळानुसार अधिक व्यापक आणि प्रभावी उपाययोजना राबवण्यात येतील
टास्क फोर्सचे सदस्य डॉ. विनायक हेगाणा यांनी सांगितले की, आता धोरणात्मक पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याने शाश्वत, वैज्ञानिक आणि मानवी दृष्टिकोनातून प्रभावी मॉडेल उभे करता येईल, शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांना निश्चितच गती मिळेल






