
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निवेदन सादर केले. शक्तिपीठ महामार्ग रद्द करणे, उसाला एकरकमी एफआरपी मिळावी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी तातडीने भरपाई द्यावी, या तीन महत्त्वाच्या मागण्या यामध्ये प्रमुख्याने मांडण्यात आल्या.
शक्तिपीठ महामार्गावरून संघर्ष
-
कोल्हापूर–सांगली मार्गावरील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच विरोध सुरू आहे.
-
माजी खासदार राजू शेट्टी यांनी या महामार्गाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, शेतजमिनींचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा ते सातत्याने करत आहेत.
-
त्याच भूमिकेला आज संघटनेनेही पाठिंबा देत महामार्गाचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी अजित पवारांकडे केली.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती : एकरकमी एफआरपीची मागणी
-
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हप्त्यांऐवजी एकरकमी एफआरपी द्यावी, अशी संघटनेची मागणी आहे.
-
ऊस दराप्रश्नी कारखानदारांकडून विलंब केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला.
-
एकरकमी दर न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे.
पुरग्रस्तांना तत्काळ मदत हवी
-
कृष्णा, पंचगंगा व इतर नद्यांच्या पुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
-
पिकांची हानी, जनावरांचे नुकसान व घरांची पडझड लक्षात घेऊन सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून मांडण्यात आली.
काँग्रेसला धक्का : राहुल-राजेश पाटील राष्ट्रवादीत
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. निष्ठावंत नेते दिवंगत पी.एन.पाटील यांचे पुत्र राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या या प्रवेशामुळे जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी अधिकच वाढणार असून, माजी मंत्री सतेज पाटील यांची राजकीय धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा होती. त्याचा परिपाक म्हणून त्यांनी थेट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा मार्ग निवडला.
या प्रवेशामुळे काँग्रेसची मते विभागली जाण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेससाठी आव्हान अधिक कठीण होणार आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीला मात्र या प्रवेशामुळे ग्रामीण भागात बळ मिळणार असल्याचे चित्र आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या मागण्यांमुळे अजित पवारांच्या कोल्हापूर दौऱ्याला राजकीय व शेतकरी प्रश्नांचा रंग चढला. पुढील काळात सरकार शक्तिपीठ महामार्गासह शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
—————————————————————————————————





