प्रसारमाध्यम | दिग्विजय माळकर
देशातील डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी Reserve Bank of India (RBI) ने मोठा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI पेमेंटवर तात्काळ ट्रान्सफर न होता सुमारे 1 तासाचा विलंब लागू शकतो.
हा नियम सध्या प्रस्तावित असून सायबर फसवणूक रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल फ्रॉडच्या घटना समोर आल्यानंतर RBI अधिक सतर्क झाले आहे.
नवीन प्रणालीप्रमाणे, 10 हजारांवरील व्यवहार केल्यानंतर रक्कम खात्यातून डेबिट होईल, पण समोरील खात्यात ती जमा होण्यासाठी एक तास लागू शकतो. या दरम्यान जर व्यवहार संशयास्पद वाटला, तर तो थांबवण्याची संधी मिळणार आहे.
यासोबतच, वापरकर्त्यांना एका क्लिकवर UPI, नेट बँकिंग आणि कार्ड सेवा तात्काळ ब्लॉक करण्याची सुविधा देण्याचाही विचार आहे. संशयास्पद खात्यांवर विशेष नजर ठेवून KYC न जुळल्यास ती खाती बंद करण्याची कारवाईही केली जाईल.
या प्रस्तावामुळे काहींनी सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वागत केले असले, तरी तत्काळ व्यवहारांची सवय असलेल्या वापरकर्त्यांमध्ये नाराजीही दिसून येत आहे.






