प्रसारमाध्यम / दिग्विजय माळकर
टाटा मोटर्सने मध्यमवर्गीय ग्राहकांना लक्षात घेऊन नवीन टाटा टीयागो 2026 बाजारात लॉन्च केली आहे. आकर्षक किंमत, आधुनिक फीचर्स आणि मजबूत सेफ्टीमुळे ही कार ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरणार असल्याचे कंपनीने सांगितले.
नवीन टियागो पेट्रोल, CNG आणि EV अशा तिन्ही पावरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध असून, या सेगमेंटमध्ये असा पर्याय देणारी ही पहिली कार मानली जात आहे. कंपनीने कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.69 लाख रुपये ठेवली आहे. पेट्रोल टॉप व्हेरिएंटची किंमत 7.29 लाख रुपये असून CNG मॉडेल 5.79 लाख रुपयांपासून 7.99 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. तर Tiago EV ची किंमत 6.99 लाख रुपयांपासून सुरू होते. BaaS (Battery as a Service) पर्यायांतर्गत EV फक्त 4.69 लाख रुपयांत खरेदी करता येणार आहे.
कंपनीने या नव्या मॉडेलमध्ये सेफ्टीवर विशेष भर दिला आहे. कारमध्ये 6 एअरबॅग्स स्टँडर्ड देण्यात आल्या असून, हाय-स्ट्रेंथ मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. खराब रस्त्यांवरही कार सहज चालेल, अशा प्रकारे सस्पेन्शन आणि बॉडी डिझाइन करण्यात आली आहे. लॉन्च इव्हेंटमध्ये कंपनीने ड्युअल इम्पॅक्ट क्रॅश डेमो सादर करून कारची सुरक्षितता दाखवून दिली.
फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, AMT व्हर्जनमध्ये पॅडल शिफ्ट आणि क्रूझ कंट्रोलसारखी आधुनिक सुविधा देण्यात आली आहे.
Tiago EV मध्ये रेंज एंजायटी कमी करण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. कंपनीकडून बॅटरीवर लाइफटाइम वॉरंटी दिली जाणार असून, फास्ट चार्जिंग सुविधेमुळे कार केवळ 30 मिनिटांत चार्ज होऊ शकते.
या कारमध्ये 1.2 लिटरचे तीन सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. पेट्रोल व्हर्जनमध्ये 86 HP तर CNG मॉडेलमध्ये 75.5 HP पॉवर मिळते. कार मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध आहे.
भारतीय बाजारात या कारचा थेट मुकाबला Maruti Suzuki,WagonR, Maruti Suzuki Celerio आणि Hyundai Grand i10 यांच्यासोबत होणार आहे.






