कोल्हापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विभागीय रेल्वे वापरकर्ता सल्लागार समिती (DRUCC) सदस्यपदी श्री. शिवनाथ बियाणी यांची सन २०२६-२८ या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या शिफारशीवरून त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवनाथ बियाणी यांनी सन २०२४-२६ या कालावधीत DRUCC सदस्य म्हणून काम केले. या कार्यकाळात त्यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासह पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या, प्रवासी सुविधा आणि रेल्वे विकासकामांबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
प्रवाशांच्या हिताचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने त्यांची २०२६-२८ या पुढील कार्यकाळासाठी पुनर्नियुक्ती केली आहे.
शिवनाथ बियाणी यांच्या पुनर्नियुक्तीमुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांना रेल्वे प्रशासनाच्या पातळीवर अधिक प्रभावीपणे मांडण्यास मदत होणार आहे.






