Google search engine
प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 
कोल्हापूरच्या महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी जनता दरबार मध्ये शहरातील अतिक्रमणां बाबत घेतलेल्या भूमिकेला अनुसरून आज कोल्हापूर नेक्स्ट च्या वतीने कोल्हापुर शहरातील अतिक्रमणांबाबत महापौर सौ. रूपाराणी निकम यांना भेटून निवेदन देण्यात आले. 
कोल्हापूर शहरामध्ये प्रशासकीय कालावधी आणि त्यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या स्वरूपाची अतिक्रमणे झालेली आहेत. त्यामध्ये फेरीवाल्यांच्या अतिक्रमणा बरोबरच मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामांचाही समावेश आहे. या बांधकामातील शेकडो बांधकामे ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेतील डीपी रोडवर आहेत. बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई ने केलेल्या अभ्यासानुसार एकूण १२३.१८ किलोमीटरच्या प्रस्तावित डीपी रोड पैकी ५५.४० किलोमीटर इतके रस्ते अजून वापरात आलेले नाहीत. याचा अर्थ मंजूर विकास योजनेतील ५०%  पर्यंतचे रस्ते अजून वापरात आलेले नाहीत. त्याचे एक कारण अशा रस्त्यांवर बऱ्याच ठिकाणी  झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे आहेत हे निमंत्रक चंद्रकांत चव्हाण यांनी  महापौर यांच्या निदर्शनास आणून दिले.  
राज्य शासनाचे अनेक आदेश, कोल्हापूर खंड पीठाने नुकत्याच दिलेल्या अतिक्रमणे हटविण्याच्या आदेशांसह मा. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे, अशा अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणाबाबत अनेक आदेश असताना महानगरपालिका प्रशासन यावर कारवाई करताना टाळाटाळ करते हे निषेधार्ह असल्याचे व  कोल्हापूरच्या विकासाला खरोखरीच चालना द्यायची असल्यास सर्वच प्रकारच्या अतिक्रमणांवर महानगरपालिकेने हातोडा चालविणे आवश्यक झाले आहे. अशी अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे शोधण्यासाठी एक मोहीम राबवावी व अशी अतिक्रमणे प्रशासनाकडून बलपूर्वक निष्कासित करुन घ्यावीत अशी मागणी माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी केली.
नगररचना विभागाने अनेक विषयात चुकीची कारवाई केल्यामुळे शहरात अतिक्रमाणांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे या अनधिकृत बांधकामे ज्यांच्या काळात झाली अशा सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी माजी नगरसेवक प्रदीप उलपे यांनी केली. राजेंद्र कारंबे यांनी आणि पुरातन वस्तु असलेल्या खोल खंडोबा देवळायजवळील अनधिकृत बांधकामचे प्रकरण सांगितले.  
सर्व विषय गंभीर असल्यामुळे महापौर यांनी आयुक्ताना पाचारण करून त्यांना संबंधित विषयात लक्ष घालून सविस्तर माहिती घेऊन संबंधित बांधकामे व अतिक्रमणे यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी हिणकू एकता चे दिपक देसाई, अनिरुद्ध कोल्हापुरे,ओंकार गोसावी, अमित टिकले,  विकी मोरे, सोहम कुराडे यांचे सह कार्यकर्ते हजर होते. 
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here