कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकाराने गरजू कुटुंबांना तेल, कडधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी तरुण मंडळाच्या महागणपती मंडपात हा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी कृष्णराज महाडिक यांनी महागणपतीचे दर्शन घेत आरती केली. रवींद्र चव्हाण यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. त्यानंतर महापौर रूपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेवक-नगरसेविका आणि भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गरजू कुटुंबांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा धान्यवाटप उपक्रम घेण्यात आल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी तसेच शिवाजी चौक तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.






