इचलकरंजी : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित भव्य शेतकरी मेळावा देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी भेट देऊन पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्यासह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असून, जवाहर कारखाना कार्यस्थळी सुमारे ६०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून शून्य-कचरा संकल्पनेवर आधारित बहुराज्य सहकारी प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. साखर उद्योगातील उपउत्पादनांपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याच्या या प्रकल्पामुळे सहकार क्षेत्रासोबतच शेतीपूरक उद्योग आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सभास्थळ, प्रवेश व्यवस्था, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था, बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच शेतकरी आणि नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
शेतकरी, सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या या कार्यक्रमासाठी कारखाना प्रशासन, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे.






