कोल्हापूर : कोल्हापूरची अस्मिता मानली जाणारी माधुरी हत्तीण कोल्हापूरकरांच्या संघर्षानंतर पुन्हा आपल्या परिसरात परतली आहे. तिच्या घरवापसीनंतर आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी नांदणी येथील मठाला भेट देत मठाचे प्रमुख स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी स्वामीजींसह जैन बांधव आणि नांदणी परिसरातील ग्रामस्थांचे अभिनंदन केले.
सतेज पाटील यांनी माधुरीची आस्थेने पाहणी करून तिला फलाहार दिला. माधुरीला पुन्हा कोल्हापूरच्या भूमीत आणि नांदणीतील आपल्या माणसांमध्ये पाहताना आनंद आणि समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
माधुरी आणि कोल्हापूरकरांमधील जिव्हाळ्याचे नाते, तिच्यासाठी एकजुटीने उभा राहिलेला जनलढा आणि अखेर झालेली घरवापसी हा प्रवास कायम स्मरणात राहणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले. जीव लावणाऱ्यांसाठी कोल्हापूरकर शेवटपर्यंत संघर्ष करतात, हे या लढ्याने पुन्हा एकदा दाखवून दिल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.






