एकसंबा : बिरेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्थेच्या एकसंबा येथील नूतन इमारतीचा शुभारंभ केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सन १९९१ मध्ये एका छोट्याशा संस्थेच्या रूपाने सुरू झालेल्या बिरेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्थेने आज मोठा विस्तार साधला आहे. कर्नाटकासह तीन राज्यांमध्ये संस्थेच्या २३३ शाखा कार्यरत असून, सुमारे ४.५ लाख सभासद आणि ५ हजार कोटी रुपयांच्या ठेवींच्या माध्यमातून संस्थेने सहकार क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गरजांना आधार देणारी संस्था म्हणून बिरेश्वर मल्टीस्टेटची वाटचाल सुरू आहे.
यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकलाताई जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या विविध सहकारी संस्थांच्या कार्याचा उल्लेख केला. या संस्थांच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, जोल्ले उद्योग समूहामार्फत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात देण्याचे काम जोल्ले कुटुंबीयांकडून सातत्याने केले जात असल्याचे सांगत, बिरेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्थेची यशस्वी वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहावी, अशा शुभेच्छा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास कर्नाटक विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजेंद्र, आर. अशोक, राज्यसभा खासदार अजित गोपछडे, आमदार शिवाजीराव पाटील, समरजीतराजे घाटगे, काडसिद्धेश्वर महाराज स्वामीजी, श्रीमंत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






