प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे संस्थापक व शिल्पकार स्व. आनंदराव ज्ञानदेव पाटील-चुयेकर यांची 88 वी जयंती ताराबाई पार्क येथील संघाच्या कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले की, 1963 साली अवघ्या 700 लिटर दूध संकलनापासून सुरू झालेल्या गोकुळ दूध संघाने आज 16 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठला आहे. या प्रगतीमागे स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि शेतकऱ्यांप्रती असलेली तळमळ महत्त्वाची ठरली आहे.
ग्रामीण भागात दूध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा असून, त्यांच्या विचारांवरच गोकुळची भविष्यातील वाटचाल सुरू राहील, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी संचालक युवराज पाटील, संभाजी पाटील, बाळासो खाडे, संचालिका अंजना रेडेकर, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळके, संकलन व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, डॉ. एम. पी. पाटील, डॉ. प्रकाश दळवी, डॉ. विजय मगदे, वाजीराव मुडुकैशिवाले, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच अधिकारी, महिला स्वयंसेविका व कर्मचारी उपस्थित होते.






