प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
राज्यात सध्या हवामानाचा अनिश्चित खेळ सुरू असून नागरिकांवर दुहेरी संकट ओढवले आहे. एकीकडे तीव्र उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशारा यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला असून अमरावती आणि अकोला येथे तब्बल 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, गडचिरोली, यवतमाळ आणि मालेगाव येथेही तापमान 43 अंशांच्या पुढे गेले आहे. मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यात तापमान 43.4 अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना उष्माघाताचा धोका वाढला आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असून प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
दुसरीकडे कोकण आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या हवामानामुळे काही प्रमाणात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यात 18 एप्रिल रोजी शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
जळगाव जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा शेतीवरही परिणाम होत असून केळीच्या बागांना मोठा फटका बसत आहे. उष्णतेमुळे केळीची पाने पिवळी पडून जळत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांसाठी सूचना :
- दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे
- पुरेसे पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा
- हलके, सूती कपडे परिधान करा
- लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या
प्रशासनाकडून सतत सूचना देण्यात येत असून नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.






