कोल्हापूर : शैक्षणिक उत्कृष्टता, कौशल्याधारित शिक्षण आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावरील ‘एड्युस्किल्स कॉन्क्लेव्ह २०२६’मध्ये ‘बेस्ट परफॉर्मिंग युनिव्हर्सिटी – २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याचवेळी डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाला ‘बेस्ट परफॉर्मिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट’ पुरस्कार मिळाला. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी हे दोन्ही पुरस्कार स्वीकारले. यावेळी एड्युस्किल्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शुभजित जगदेव उपस्थित होते.
एड्युस्किल्स फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजांनुसार कौशल्य प्रशिक्षण, सर्टिफिकेशन आणि व्हर्च्युअल इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. विद्यापीठाने फाउंडेशनसोबत केलेल्या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि जुनिपर नेटवर्क्स यांसारख्या कंपन्यांच्या सहकार्याने क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डेटा अॅनालिटिक्स आणि आयओटी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व सर्टिफिकेशन मिळत आहे.
प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना सुमारे तीन महिन्यांची विनामूल्य व्हर्च्युअल इंटर्नशिपही उपलब्ध होते. सहभागी विद्यापीठांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केल्याची कामगिरी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने नोंदवली आहे.
या दुहेरी पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे कुलपती संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. अजित पाटील यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.






