कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराला वेग आला आहे. विविध जिल्ह्यांतील राजकीय नेते, शिक्षण क्षेत्रातील पदाधिकारी, शिक्षक प्रतिनिधी आणि कर्मचारी संघटनांच्या मान्यवरांशी भेटीगाठी घेत गावडे शिक्षकांच्या प्रश्नांवर संवाद साधत आहेत.
प्रचारदौऱ्यात गावडे यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनील काटकर, आयटीआय संघटनेचे अध्यक्ष नेताजी बेचले, सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, शिल्पनिदेशक चिंतामणी काटवते, आर. वाय. जाधव आणि पुणे माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे मार्गदर्शक गुलाबसिंग कदम यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटींदरम्यान शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या, शैक्षणिक क्षेत्रातील बदल आणि शिक्षकांच्या सेवाविषयक प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती त्यांच्या प्रचार यंत्रणेकडून देण्यात आली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीमुळे प्राध्यापक पदसंख्येवर परिणाम होऊ नये, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी व्हावा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती व्हावी आणि शिक्षकांच्या प्रश्नांचा विधानपरिषदेत प्रभावीपणे पाठपुरावा व्हावा, या मुद्द्यांवर गावडे यांनी भर दिला आहे.
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील शिक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष भेटीगाठी आणि संवादावर त्यांच्या प्रचारात भर दिला जात आहे. आगामी काळात विविध शिक्षक संघटना आणि शिक्षण संस्थांशी संपर्क वाढवून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याची भूमिका गावडे यांच्या प्रचार यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आली आहे.






