पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून पुणे पदवीधर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीकडून डॉ. स्मिता जाधव यांना तर, शिक्षक मतदार संघातून कौस्तुभ गावडे यांना महायुतीचे उमेदवारी मिळाली आहे. आज पुण्यात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या निवडणुकीच्या प्रचारासाठीची रणनीती कशी असेल याविषयी बैठक झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलेल्या निवडणुकीच्या रणनीतीनुसार पदवीधर मतदार संघातील उमेदवार महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा ५० हजार मताधिक्यांनी तर, शिक्षक मतदार संघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा १० ते १५ हजार मताधिक्यांनी विजय निश्चित होईल असा मला विश्वास आहे. गेल्या काही वर्षात माझ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुणे मतदार संघात मतदारांची नोंदणी करण्यात आली असून त्याचाही फायदा महायुतीच्या उमेदवारांना होईल असा विश्वास मी या बैठकीत व्यक्त केला.
महायुतीच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या बैठकीवेळी दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन केले व विजयासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पुढारी वृत्तपत्राचे संचालक डॉ. योगेश जाधव, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. श्रीमंत कोकाटे, प्रदीप कंद, प्रा. जी. के. थोरात, समित कदम आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.






