कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
पश्चिम महाराष्ट्रात (कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत ) गेल्या १२ तासांत हवामानात लक्षणीय बदल झालेला आहे. या भागात वाऱ्यांची दिशा बदलताच ढगांची घनता वाढली आहे आणि अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे.
नदीकाठच्या आणि डोंगराळ भागांत ढगाळ वातावरण आहे, तर काही भागांत पावसाच्या जोरदार सरी पडण्याची चिन्हे आहेत. पुढील दोन दिवस कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पुणे शहर व परिसरात उकाडा कायम आहे, परंतु ढगाळ वातावरणामुळे दमट हवामान जाणवत आहे. काही भागांत तुरळक सरी कोसळल्या आहेत. सिंहगड, भोर, मुळशी परिसरात सरी अधिक प्रमाणात पडत आहेत. पुढील २४ तासांत पुण्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
सोलापूर भागात आत्तापर्यंत फारसा पाऊस झाला नाही. मात्र आकाश ढगाळ असून काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. उकाडा मात्र अद्याप कायम आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील हवामान विभागाने ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन दिवस या भागातही मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विकेण्डला राज्यभरात वातावरणात मोठा बदल होणार असून मान्सूनचे वारे पुन्हा जोरात सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकणात १३ जूनपासून १७ जूनपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व भारतात मात्र पुढील २४ तासांत हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. मात्र त्यानंतरच्या चार दिवसांत तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे. राज्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.






