महाराणी ताराराणी समाधीस भेट ; संगम माहुलीत खा. शाहू महाराजांची पाहणी

0
429
Kha. Shahu Maharaj and others inspecting the tomb of Maharani Tararani at Sangam Mahuli
Google search engine

सातारा : प्रसारमाध्यम न्यूज

ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या महाराणी ताराराणी यांच्या समाधीकडे गेल्या काही काळात दुर्लक्ष झाल्याने इतिहासप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी संगम माहुली येथे भेट देऊन समाधिस्थळाची पाहणी केली.  महाराणी ताराराणी समाधिस्थळाचे संरक्षण, जीर्णोद्धार व नूतनीकरणाचे काम चांगल्या पद्धतीने व लवकर होण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही खा. शाहू महाराज यांनी दिली.

खा. शाहू महाराज यांची पाहणी –

कृष्णा नदीच्या पात्रात काशी विश्वेश्वर मंदिराजवळ असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यांखाली गेलेल्या महाराणी ताराराणी यांच्या समाधीस्थळाची पाहणी केली. तसेच थोरले शाहू महाराज यांच्या समाधीचे आणि आप्पासाहेब महाराज यांच्या मंदिराजवळ ठेवलेल्या महाराणी ताराराणी यांच्या वज्रलेप केलेल्या दगडी अवशेषांचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून समाधी संवर्धनाबाबत त्यांच्या भावना जाणून घेतल्या.  

खा. शाहू महाराज म्हणाले –

शासनाने महाराणी ताराराणी समाधी जीर्णोद्धाराचे काम गांभीर्याने घेतले आहे. हे काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. हे केवळ एक स्मारक नसून इतिहासाशी जोडलेले श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथील पर्यटकांची आणि इतिहासप्रेमींची संख्या निश्चितच वाढणार आहे.

उपस्थिती –

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, संजय कदम, संगम माहुलीचे सरपंच प्रवीण शिंदे, प्रकाश माने, राहुल शिवनामे, चंद्रकांत कुंभार, अविनाश कोळपे, पोलिसपाटील शशिकला धोत्रे, जयवंत सपकाळ, शशिकांत सपकाळ, राजेंद्र देसाई यांच्यासह कोल्हापूर व साताऱ्याचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच बैठका घेऊन समाधीस्थळाच्या जतन व संवर्धनासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. खा. शाहू महाराज यांच्या या भेटीमुळे कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी बैठक-

संगम माहुली येथील महाराणी ताराराणी यांच्या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासाठी कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सातार्‍याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी विशेष बैठक घेतली. या बैठकीत संतोष पाटील यांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी तयार केलेला प्राथमिक आराखडा सादर केला. खा. शाहू महाराज यांनी आराखड्याची बारकाईने पाहणी करून काही महत्त्वाचे बदल सूचवले. यावर जिल्हाधिकारी पाटील यांनी हे बदल लक्षात घेऊन अंतिम प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर केला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच, दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांमध्ये उत्तम समन्वय असल्याने काम वेळेआधी पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

——————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here