कोल्हापूर : कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) – सदर्न महाराष्ट्र झोन यांच्या वतीने आयोजित CII Agri Innovation Summit 2026 नुकताच कोल्हापुरात उत्साहात पार पडला. या परिषदेत उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, कृषी तज्ज्ञ, उद्योजक, शेतकरी, संशोधक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.परिषदेत कृषी क्षेत्रातील नव्या संधी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मूल्यवर्धन, निर्यातवाढ आणि जागतिक स्तरावरील यशस्वी मॉडेल्स यांवर चर्चा झाली. नेदरलँड्स आणि इस्रायलसारख्या देशांनी कृषी क्षेत्रात साधलेली प्रगती लक्षात घेता भारतीय शेती अधिक उत्पादक आणि स्पर्धात्मक बनविण्याची गरज वक्त्यांनी व्यक्त केली.यावेळी वीरेंद्र पाटील यांनी CII च्या विविध उपक्रमांची माहिती देत उद्योग आणि कृषी क्षेत्रातील सहकार्याचे महत्त्व विशद केले.
मुख्य वक्ते श्री अशोक काकडे, व्यवस्थापकीय संचालक, MAIDC, यांनी कृषी क्षेत्रातील गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि बाजारपेठेतील संधी याविषयी मार्गदर्शन केले.
परिषदेमध्ये कृषी व औद्योगिक क्लस्टर्सची निर्मिती, कृषी उद्योजकतेला प्रोत्साहन, काढणीनंतरच्या तंत्रज्ञानाचा (Post-Harvest Technology) वापर, कृषी पर्यटन, फलोत्पादन आणि मूल्यवर्धित उत्पादनांद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उपायांवर चर्चा झाली. तसेच APEDA सारख्या संस्थांच्या माध्यमातून कृषी निर्यात वाढविणे आणि शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबतही विचारमंथन करण्यात आले.
दक्षिण कोरियासारख्या देशांच्या उदाहरणांचा उल्लेख करत उद्योग, शिक्षणसंस्था, शासन आणि शेतकरी यांच्यात अधिक प्रभावी समन्वयाची गरज व्यक्त करण्यात आली. ‘विकसित भारत 2047’ या उद्दिष्टाच्या पूर्ततेमध्ये कृषी क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गिरीश चितळे यांनी अशा प्रकारच्या परिषदांमुळे शेतकरी, कृषी उद्योजक आणि तरुणांना नव्या संधींची माहिती मिळून कृषी क्षेत्रात नवकल्पनांना चालना मिळते, असे सांगितले.
श्री अनिलकुमार गुप्ता यांनी हरित, धवल आणि निळ्या क्रांतीचा उल्लेख करत भारताच्या कृषी विकासाचा आढावा घेतला. संशोधन, तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धतींच्या आधारे पुढील कृषी क्रांती घडवून आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच कृषी क्षेत्रातील नवकल्पनांसाठी विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
परिषदेचा समारोप श्री मल्हार भांदुर्गे यांनी केला. कृषी क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, रोजगारनिर्मितीला गती देणे आणि दक्षिण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला बळकटी देणे हा या परिषदेतून पुढे आलेला प्रमुख संदेश असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी उद्योग, शिक्षणक्षेत्र आणि शासन यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी CII कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. यावेळी मान्यवर श्री ऋतुराज पाटील, श्री चेतन नरके, श्री आबासाहेब काळे, श्री प्रतीक पाटील, श्री सारंग जाधव, श्री आदित्य बेडेकर उपस्थित होते






