प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक
नेपाळ मधील काठमांडू येथील बहुउद्देशीय ज्युडो स्टेडियम, लॅनचोर येथे 15 आणि 16 मे 2026 रोजी 11 वी ज्युनिअर आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत नेपाळ, भारत, भूतान, बांग्लादेशसह विविध देशांतील 600 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी टनेल डोजो कराटे असोसिएशन नेपाळचे प्रमुख मा. नरेश श्रेष्ठ, बागमती प्रदेशाच्या माजी सामाजिक विकास मंत्री मा. हरी प्रभा सदगी, नेपाळ राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू संघाचे अध्यक्ष मा. दीपक श्रेष्ठ, शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सिहान रमेश पिसाळ सर तसेच अविनाश पाटील सर उपस्थित होते.
या स्पर्धेत भारतातील 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. उत्कृष्ट कामगिरी करत भारताने सर्वाधिक पदकांच्या जोरावर स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील 24 खेळाडूंनी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत कुमिते प्रकारात 4 सुवर्ण, 13 रौप्य आणि 4 कांस्य पदके मिळवली. तसेच काता प्रकारात 1 कांस्य पदकाची कमाई केली.
भारतीय खेळाडूंच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.






