प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
व्हँकुव्हर (VANCOUVER): FIFA ने मंगळवारी यंदाच्या विश्वचषकासाठी आर्थिक वाटपात मोठी वाढ जाहीर केली. संघांच्या वाढत्या प्रवास, कर आणि इतर खर्चांबाबत व्यक्त झालेल्या चिंतेनंतर ही वाढ करण्यात आली असून एकूण रक्कम आता जवळपास ९०० दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचली आहे.
फिफाच्या निवेदनानुसार, मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेसाठी एकूण आर्थिक वाटप ७२७ दशलक्ष डॉलरवरून वाढवून ८७१ दशलक्ष डॉलर करण्यात आले आहे.
ही घोषणा फिफा कौन्सिलच्या बैठकीनंतर करण्यात आली. काही सदस्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचा खर्च जास्त असल्याने तोट्याची शक्यता व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर फिफाने प्रत्येक ४८ पात्र संघांसाठी तयारी खर्चाची रक्कम १.५ दशलक्ष डॉलरवरून २.५ दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवली आहे.
तसेच स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या संघांना मिळणारी रक्कम ९ दशलक्ष डॉलरवरून १० दशलक्ष डॉलर करण्यात आली आहे. याशिवाय संघांच्या प्रवास खर्चासाठी आणि तिकिटांच्या वाटपातही वाढ करण्यात आली आहे.
फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो (Gianni Infantino) यांनी सांगितले की, “फिफा सध्या आर्थिकदृष्ट्या सर्वात मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे सदस्य संघटनांना यापूर्वी कधीही न झालेल्या प्रमाणात मदत करता येत आहे.”
२०२६ चा विश्वचषक हा इतिहासातील सर्वात मोठा स्पर्धा ठरणार असून फिफाला या चार वर्षांच्या चक्रात सुमारे १३ अब्ज डॉलरचे उत्पन्न अपेक्षित आहे.
मागील वर्षी जाहीर केलेल्या माहितीनुसार, विजेत्या संघाला ५० दशलक्ष डॉलर, उपविजेत्याला ३३ दशलक्ष डॉलर, तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला २९ दशलक्ष डॉलर तर चौथ्या क्रमांकाच्या संघाला २७ दशलक्ष डॉलर मिळणार आहेत.






