प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘देऊळ बंद 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 21 मे 2026 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर स्वामीभक्त आणि चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. त्यातच आता चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
पोस्टरमध्ये स्वामी समर्थ प्रसन्न मुद्रेत आशीर्वाद देताना दिसतात, तर अभिनेत्री स्नेहल तरडे दुचाकी चालवत असून तिच्या चेहऱ्यावर राग आणि डोळ्यांत अश्रू दिसतात. या विरोधाभासी भावनांमुळे चित्रपटाच्या कथेबाबत प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
पहिल्या भागात प्रभावी अभिनयाने छाप पाडणारे मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामींच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या दमदार सादरीकरणामुळे प्रेक्षकांना स्वामींचा जिवंत अनुभव मिळणार आहे. या भागात कथा एका सामान्य कुटुंबाभोवती फिरत असून, स्वामीकृपेने त्यांच्या आयुष्यात होणारे बदल दाखवले जाणार आहेत.
या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली असून, Vatvruksha Entertainment या बॅनरखाली चित्रपट साकारला गेला आहे.
आध्यात्मिकता, भावनिकता आणि वास्तववादी कथानकाचा संगम असलेला देऊळ बंद2 प्रेक्षकांना भावनिक प्रवास घडवणार आहे. पोस्टर पाहूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






