कोल्हापूर : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या हिरकणी मंचातर्फे विद्यार्थिनींसाठी आयोजित पारंपरिक ‘गौराई खेळ’ स्पर्धा उत्साहात पार पडली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी झिम्मा, फुगडी, घागर घुमवणे, काठवट-काना, सूप नाचवणे तसेच विविध गौरीगीते सादर करून महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविले.
पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि मधुरा नरके यांच्या हस्ते गणेश-गौरी पूजन व मंगलारतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी १०० हून अधिक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत पारंपरिक गौराई खेळ सादर केले.
झिम्मा स्पर्धेत सावित्री ग्रुपने प्रथम, सिव्हिल गर्ल्स ग्रुपने द्वितीय, तर राजमुद्रा ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना करवीर भूमी अभिलेख विभागातील श्रीमती संगीता पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि परीक्षक सुलोचना बागडी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिरकणी मंचाच्या प्रमुख प्रा. नीलम रणदिवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शीतल साळोखे, तसेच प्रा. ऐश्वर्या पाटील, सिद्धी जाधव, सुहासी साळोखे, नेहा माने आणि गायत्री आयरे यांच्यासह सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.






